रशियावर निर्बंधांची धमकी असली तरी भारताच्या इंधनपुरवठ्यावर परिणाम नाही – हरदीप सिंग पुरी

नवी दिल्ली – जर ब्राझील, चीन आणि भारताने युक्रेनशी युद्ध करणार्या रशियाकडून खनिज तेल खरेदी केले तर या तीन देशाविरोधात 100% आयात शुल्क लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नाटो संघटनेने दिली आहे. मात्र याचा भारतातील इंधनपुरवठ्यावर कसलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची क्षमता भारताकडे आहे. भारत आपल्या गरजे इतके खनिज तेल कोणत्याही स्त्रोताकडून खरेदी करू शकेल असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले आहे.
जर रशियाकडून तेल मिळाले नाही तर भारताकडे पर्यायी अनेक स्त्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला कसलाही धोका नाही. अगोदर भारत मुख्यतः मध्यपर्वेतील देशातून तेल खरेदी करत होता. मात्र गेल्या तीन वर्षापासून भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढविली आहे. सध्या भारत आपल्या गरजेच्या 40% तेल रशियाकडून खरेदी करता.े तीन वर्षांपूर्वी भारत रशियाकडून आपल्या गरजेच्या केवळ 0.2 टक्के तेल खरेदी करीत होता.
भारत आपल्या गरजेच्या 85% खनिज तेल आयात करतो. त्यामुळे भारताला विविध पर्यायी स्त्रोत तयार ठेवावे लागतात. भारत हा गयाना, ब्राझील, कॅनडा यांच्याकडून भारत तेल खरेदी करू शकतो. आम्ही पर्यायी स्त्रोत विकसित केल्यामुळे आमच्या ऊर्जा सुरक्षिततेबाबत आमच्या मनात कसलीही शंका किंवा भीती नाही. काही वर्षांपूर्वी आम्ही 27 देशाकडून खनिज तेल खरेदी करीत होतो आता ही संख्या 40 इतकी झाली आहे.
गेल्या तीन वर्षात भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले आहे. त्यामुळे जगाचा फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. जर भारताने रशियाकडून या कालावधीत खनिज तेल खरेदी केले नसते तर जगातील खनिज तेलाच्या किमती 70 डॉलर ऐवजी 140 डॉलर प्रति पिंपीपर्यंत गेल्या असत्या असे पुरी यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था मोठी आहे आणि भारताला खनिज तेल आयात करावे लागते. भारतातील महागाई कमी ठेवण्यासाठी भारताला कमी किमतीवरील खनिज तेलाची आवश्यकता असते असे पुरे यांनी स्पष्ट केले.
युरोपही करतो रशियाकडून खरेदी
तेल उत्खननासंबंधातील कार्यक्रमात बोलताना पुरी यांनी सांगितले की, नाटो सदस्य देश भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून सांगत आहेत. मात्र हेच देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची खरेदी करतात. भारत रशियाकडून तीन महिन्यात जेवढे तेल खरेदी करत नाहीत तेवढी खरेदी युरोपातील देश रशियाकडून एका दिवसात करतात, याची आकडेवारी उपलब्ध आहे.





