आषाढी असूनही साबुदाणा, भगरीचा बाजार यंदा मंद

पुणे – आषाढी एकादशीच्या उपवासासाठी दरवर्षी साबुदाणा, भगरीला मोठी मागणी असते. मात्र, यंदा नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे. परिणामी, साबुदाण्याच्या भावात मार्केट यार्डातील भुसार बाजारात मागील चार दिवसांत किलोमागे एक ते दीड रुपयांनी घट झाली आहे. तर, भगरीचे भाव स्थिर आहेत.
तामिळनाडू येथील सेलम जिल्ह्यातून संपूर्ण देशात साबुदाण्याची निर्यात होते. आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून साबुदाण्याची मागणी वाढेल, अशी शक्यता धरून सेलम जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी साबुदाण्याच्या भावात तेजी आणण्याचा प्रयत्न केला. मागील महिन्यात किलोमागे दोन ते अडीच रुपयांनी भाववाढ केली.
मात्र, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास २० टक्के मागणी कमी आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी पुन्हा भावात घट झाली आहे. येथील बाजारात दररोज २०० ते २५० टन साबुदाण्याची आवक होत आहे. ती देखील नेहमीच्या तुलनेत कमी आहे. तर भगरीचे भाव मुळातच अधिक आहेत. त्यामुळे भगरीलाही कमी मागणी आहे.
“दरवर्षीच्या तुलनेत यंदा साबुदाण्याला मागणी कमी राहिली आहे. तर, महाग असल्यामुळे भगरीलादेखील तितकासा उठाव नाही. मार्केट यार्डात नाशिक जिल्ह्यातून दररोज २५ ते ३० टन भगरीची आवक होत आहे.” – अशोक लोढा, व्यापारी, मार्केट यार्ड.
घाऊक बाजारातील किलोचे भाव
साबुदाणा १ – ७२ ते ७५
साबुदाणा २ – ६७ ते ७०
साबुदाणा ३- ६२ ते ६५
भगर – ९५ ते ११०
शेंगदाण्याला मध्यम मागणी
शेंगदाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, आषाढी एकादशीच्या तुलनेत मध्यम स्वरूपाची मागणी आहे, असे मार्केट यार्डतील शेंगदाण्याचे व्यापारी गणेश चोरडिया यांनी सांगितले. येथील बाजारात दररोज ६० ते ७० टन माल दाखल होत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश येथून आवक होत आहे. स्पॅनिशच्या चांगल्या मालाला घाऊक बाजरात किलोला १२२ रुपये, घुंगरूला १०४ ते ११२ रुपये, शेंगदाणा १ नंबरला १२० रुपये, २ नंबरला ११२ आणि ३ नंबरला ९५ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.





