पुणे | बंदी आदेशानंतरही “लेझर शो’ची जोरात तयारी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्यवस्ती आणि उपनगरांत मागील काही वर्षांत दहीहंडी उत्सव वाढला आहे. यामध्ये प्रखर लेझर दिव्यांचा वापर, तसेच उच्चक्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापरही वाढला आहे. यंदाही शहरातील अनेक मंडळांनी खास लेझर शो आयोजित केला आहे.
यासाठी मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद, दिल्लीतील ध्वनीवर्धक यंत्रणा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पाचारण केले आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येणार असून, रविवारी रात्रीपासून काही मंडळांनी लोखंडी सांगाडे उभे करून त्यावर “बीम लाइट’ लावण्यास सुरुवातही केली.
मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. यामुळे अनेकांना त्रास झाला होता. काहींच्या डोळ्यांना इजा झाली होती. ध्वनिवर्धकाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.
पोलीस आयुक्तालयात मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यानंतर सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्याचे आदेश नुकतेच दिले.
तरही आदेशाकडे दुर्लक्ष करून मध्यभागासह उपनगरातील मंडळांनी दहीहंडीनिमित्त ‘”बीम लाइट’ची तयारी केली आहे. यातील बहुतांश मंडळांना राजकीय राजाश्रय आहे. यामुळे पोलीस कितपत कारवाई करणार? हा प्रश्न आहे.
ध्वनिवर्धक, तसेच लेझर दिव्यांबाबत दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करणे गरजेचे आहे. दहीहंडीनिमित्त मध्यभागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गैरप्रकार, तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. – संदीपसिंग गिल्ल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक





