पुणे जिल्हा | कोट्यावधींचा निधी खर्चूनही तांबडेमळा गाव पाण्यापासून वंचित

मंचर, (प्रतिनिधी) – नळ योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळील तांबडेमळा गाव पाण्यापासून वंचित राहिले आहे. पाणीपुरवठा योजनेची चौकशी करून दोशींवर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच मयूर भोर यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कोट्यवधी रूपये खर्च करून देखिल तांबडेमळा गाव पाण्यापासून वंचित आहे.लेखाशिर्ष महाजल योजनेअंतर्गत ७६ लाख ११ हजार ७०० रूपये तसेच जलजीवन योजने अंतर्गत १ कोटी ८८ लाख ८८ हजार २९७ रूपये इतका खर्च करून देखिल गावाला पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे.
निकृष्ट दर्जाचे काम तसेच अधिकाऱ्यांनी कामात लक्ष न दिल्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. वारंवार अधिकाऱ्यांना संपर्क करून देखिल अधिकारी कामात लक्ष देत नाहीत, लवकरच दोन्ही पाणी योजनांची चौकशी करावी, अशी मागणी गटविकास अधिकारी आंबेगाव तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मागणी करणार आहोत, असे उपसरपंच मयूर भोर यांनी सांगितले.
लेखाशिर्ष योजने अंतर्गत झालेले काम अपूर्ण असून ते काम निकृष्ट दर्जाचे आहे, तसेच केंद्र शासनाचे जलजीवन मिशनसाठी करोडो रूपये खर्च केले आहेत. ते काम चांगल्या दर्जाचे व्हावे आणि योजनेचा लाभ सर्वांना व्हावा, ही आमची अपेक्षा आहे. तांबडेमळा जलजीवन मिशनच्या दोन्ही पाण्याच्या टाक्या चुकीच्या पध्दतीने बांधल्या आहेत. त्यामुळे पूर्ण गावाला पाणी जात नाही. तसेच पाईपलाईन वारंवार फुटत आहे.
तसेच ठेकेदाराकडून ग्रामपंचायतकडे पाईपलाईन वर्ग केल्यानंतर पाईपलाईन दुरूस्तीचा खर्च ग्रामपंचायतला परवडणारा नाही. भविष्यात येणाऱ्या पाण्याच्या अडचणींना जबाबदार कोण याचा प्रश्न आम्हांला पडला आहे. या योजनेची चौकशी करून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अन्यथा आंदोलन केले जाईल. – मयूर भोर, उपसरपंच तांबडेमळा.





