फुग्याच्या स्फोटातून थोडक्यात बचावले नेपाळचे उपपंतप्रधान; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

काठमांडू : नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद पौंडेल यांना आज भाजल्यामुळे दुखापत झाली. एका पर्यटन मेळ्याच्या उद्घाटनाच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत ते भाजले गेले. त्यांना तात्काळ हेलिकॉप्टरने काठमांडूला हलवण्यात आले. उपपंतप्रधान पौडेल हे देशाचे अर्थमंत्री देखील आहेत. कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या समवेत पोखराचे महापौर धनराज आचार्य देखील जखमी झाले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात मेणबत्तीने दीपप्रज्वलन करत असताना हायड्रोजन बलून पेटल्यामुळे ते भाजले गेले. पौडेल यांच्या डोक्याला आणि हाताला भाजले आहे. तर आचार्य यांच्या चेहऱ्याला भाजले असल्याचे महापौरांच्या स्वीय सचिवांनी सांगितले. दोन्ही जखमी नेत्यांवर पोखरा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने काठमांडूला हलवण्यात आले आहे.
मात्र दोन्ही नेत्यांच्या झालेली दुखापत गंभीर नसल्याचेही स्वीय सहायकाने सांगितले. पोखराच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिजिट पोखरा यीअर या पर्यटन मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५ या वर्षात पोखरामध्ये २ दशलक्ष पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या पर्यटन मेळ्याचे आयोजन केले गेले आहे.



