Moshi Incident: मोशी दुर्घटनेप्रकरणी उपअग्निशमन अधिकारी निलंबित
आयुक्तांचे विभागीय चौकशीचे आदेश

पिंपरी – मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आणखी एक प्रशासकीय कारवाई केली आहे. तत्कालीन उपअग्निशमन केंद्र अधिकारी ऋषिकांत हिरामण चिपाडे यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हा आदेश जारी केला आहे. या दुर्घटनेप्रकरणी यापूर्वी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधातही विभागीय चौकशी सुरू आहे.
महापालिकेच्या आदेशानुसार, चिपाडे यांनी प्रशासनिक इमारतीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता आणि मंजूर आराखड्याची पडताळणी न करताच अंतिम अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) दिल्याचा आरोप आहे. प्रत्यक्ष उभारण्यात आलेले बांधकाम आणि मंजूर आराखड्यात मोठी तफावत असतानाही त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही.
या हलगर्जीपणामुळे अनधिकृत अतिरिक्त बांधकामावर वेळेत कारवाई झाली नाही आणि ८ जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत पडल्याने नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला, असा ठपका आदेशात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी महापालिकेने यापूर्वी चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला होता. त्यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक आढळल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.
तसेच त्यांच्या विरोधात सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आदेशात कर्तव्यातील गंभीर निष्काळजीपणा, पदाचा गैरवापर तसेच अग्निसुरक्षा नियम आणि राष्ट्रीय इमारत संहितेच्या तरतुदींचे प्रथमदर्शनी उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Pune District : इंद्रायणी दगडी घाटावरील उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका





