मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, ते चांगलेच संतापले. “ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर मी का बोलू? दुसरं काही विचारा,” असं शिंदे यांनी रागाने म्हंटले. या घटनेने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. नुकतेच शिंदे यांनी 15 एप्रिलला राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन केले होते. या भेटीमुळे शिंदे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या बातम्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला अस्वस्थ केल्याचं दिसत आहे. येत्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी मतांचं विभाजन टळू शकतं, ज्याचा फटका शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांनीही सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिंदे यांच्या अस्वस्थतेवर सोशल मीडियावर टीका करत आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.