पुणे | उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एकतानगर भागातील पूरग्रस्त परिसराला भेट देऊन तेथील मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला, तसेच पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. बाधित नागरिकांना राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या वेळी आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. प्रशासनाला पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार नागरिकांना मदत देण्यात येईल.
यापुढे पाण्याच्या प्रवाहात अडथळा येणार नाही, यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. त्यासाठी प्रवाहातील झाडे आणि परिसरात टाकलेला भराव बाजूला केला जाईल. नागरिकांना अन्न आणि पाणी देण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात येईल, असे पवार म्हणाले.
खडकवासला धरणातून नियंत्रित पद्धतीने विसर्ग सुरू करण्यात आला होता. तथापि, पुणे शहर परिसरात मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊ शकला नाही आणि पूरस्थिती निर्माण झाली. धरणातील विसर्ग नियंत्रित करून पुराची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. धरणातील विसर्ग नियंत्रित करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.
खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून रात्रीच्या वेळी समस्या येणार नाही, याची दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त नागरिकांना शासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. यापुढे पूरस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येतील, असे पवार यांनी या वेळी सांगितले.
या वेळी पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले. महापालिका प्रशासनालाही त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे निर्देश दिले. त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून खडकवासला धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत चर्चा केली.





