Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा रद्द; मनोज जरांगे यांच्याशी सरकार पुन्हा चर्चा करणार?

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे, सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत.
अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गणेशत्सवासाठी दरवर्षी दरे या आपल्या मूळगावी जात असतात. मात्र, हा दौरा रद्द होण्यामागील नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही. परिणामी नियोजित असलेला दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना दहन आले आहे.
शिंदेंचा दरे गावचा दौरा अचानक रद्द झाल्याने या बाबत मनोज जरांगे यांचे सुरु असलेलं आंदोलन देखील कारणीभूत असल्याची चर्चा आता जोर धरत आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी सरकार पुन्हा चर्चा करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं असताना शिंदेंनी आजपर्यंत त्यावर मौन बाळगल्याचं दिसून येतं आहे. मुख्यमंत्री असताना जरांगेंची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असताना शिंदे आता गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संदीप क्षीरसागर यांनी जरांगेंची घेतली भेट
बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ जरांगे यांची भेट घेत आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला. त्याशिवाय आपण मुंबईपर्यंत तुमच्यासोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार म्हणून मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांच्यासोबत बोलणार असल्याचे देखील क्षीरसागर यांनी एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना म्हंटले आहे.





