विनोद कांबळींसाठी उपमुख्यमंत्र्यांनी पुढे केला मदतीचा हात, उपचारासाठी जाहीर केली 5 लाखांची मदत

Vinod Kambli Health update: माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालवल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर मदतीचा ओघ पुढे आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कांबळी यांच्या मदतीसाठी पुढे आले असून, श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी रुग्णालयात कांबळी यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी घ्या अशी विनंतीही त्यांनी केली.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांच्या उपचारासाठी वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने ही मदत केली जाणार आहे. याशिवाय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, विनोद कांबळी यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानंतर भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना विविध आजारांनी ग्रासले असून, त्यांच्या मेंदूमध्ये गुठळ्या आढळल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.





