Budget 2024 : “शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं..” अर्थसंकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टचं सांगितलं

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता संसदेत आर्थिक वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीपूर्वी सादर होणारा मोदी सरकारच्या चालू कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सुमारे तासभर भाषण केले. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. अर्थसंकल्पाबाबत देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा आहे असं अजित पवार यांनी म्हंटल आहे.
अजित पवार यांनी याबाबत सविस्तर पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसारित केली आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांची पोस्ट जशीच्या तशी
“केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, आज लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती. त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला आहे.
या अर्थसंकल्पानं २०४७ पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली आहे. गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे. संशोधनाला चालना देण्यासाठी कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संशोधन व विकास या क्षेत्रांत नवीन उद्योग यावेत यासाठी ५० वर्षे कालावधीचे व्याजमुक्त अर्थसाह्य, त्यासाठी सरकार एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार तसंच राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचं ५० वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा, या सगळ्या बाबी राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत.
प्रधानमंत्री किसान योजनेतून ११ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत, ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा लाभ, आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी, तीळ, सूर्यफुल, शेंगदाणा, सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न, दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना, राष्ट्रीय गोकुल मिशनसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे. देशात ३ हजार नवीन आयटीआय, ७ आयआयटी, १६ आयआयआयटी, ७ आयआयएम तसंच १५ एम्स आणि ३९० विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारी, त्यांना संधी देणारी आहे.”
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 1, 2024
CM शिंदे म्हणतात..
गेल्या ६० वर्षांत जे निर्णय झाले नाहीत, ते गेल्या १० वर्षांत झाले. गरीब, शेतकरी, महिला व तरुण या चार प्रमुख घटकांना त्यांनी न्याय दिला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आजच्या अर्थसंकल्पात महिला व मुलींना प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधान आवास योजनेत २ कोटी घरं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे रोटी, कपडा, मकान देणारा हा अर्थसंकल्प व हे केंद्र सरकार आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.यांनी दिली.





