संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान; कर्मभूमीत रंगले दिंडीतील पहिले रिंगण

नेवासा – ज्ञानोबा-माऊली तुकारामचा गजर करत नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिर देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी दिंडीचे बुधवारी हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान झाले. दिंडीत सुमारे पाचशे वारकऱ्यांचा सहभाग असून माऊली माऊली, असा जयघोष करत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कर्मभूमी असलेल्या नेवासेनगरीत दिंडीतील पहिले रिंगण रंगले.
बुधवारी सकाळी दिंडीच्या प्रस्थानापूर्वी माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या पैसखांबाचे वेदमंत्राच्या जयघोषात चंदन उटी लावून हभप शिवाजी महाराज देशमुख, आमदार शंकरराव गडाख, महंत रमेशानंदगिरी महाराज, अयोध्या येथील रामायणाचार्य महंत रामशरण महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आमदार शंकरराव गडाख, मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रामभाऊ जगताप, कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव, कृष्णा महाराज हारदे, राम महाराज खरवंडीकर, लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्राकृत चांदीच्या पादुकांचे पूजन झाले.
या पादुका डोक्यावर घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिराला दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये माऊलींच्या पादुका ठेवण्यात आल्या. यावेळी आमदार शंकरराव गडाख, पांडुरंग अभंग, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, इंजि. सुनीलराव वाघ, रामभाऊ खंडाळे, डॉ.लक्ष्मण खंडाळे यांनी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातून संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी दिंडीस प्रारंभ करण्यात आला. अग्रभागी नृत्य करणारे अश्व, त्यामागे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करणारे वारकरी, भजनी मंडळाचे पथक, पुष्पांनी सजविण्यात आलेला पालखी रथ, डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या महिला भाविक, असे या दिंडीचे स्वरुप होते. नेवासा नगरीत या दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी व तोफांची सलामी देत चौकाचौकात स्वागत करण्यात आले. विविध संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी शिवाजी महाराज देशमुख यांचे संतपूजन करत पालखीचे दर्शन घेतले.
या दिंडीचे नेवासा येथील एसटीच्या प्रांगणात साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले असता रिंगण सोहळ्याचे पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करण्यात आले. माऊली माऊली असा जयघोष करत सर्वप्रथम झेंडा पथकाचे, त्यानंतर भजनी मंडळ व वारकऱ्यांसह महिलांचे रिंगण सादर करण्यात आले. संतसेवक बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेले अश्व नृत्य उपस्थित भाविकांचे आकर्षण ठरले होते.





