Dengue Cases: सप्टेंबर ठरला डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’! संशयितांचा आकडा १५०० पार, आरोग्य यंत्रणा सतर्क
Dengue Cases: सप्टेंबर महिन्यात डेंग्यूने गाठला उच्चांक; १,५०० पेक्षा जास्त संशयित रुग्णांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली.

Dengue Cases- पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूचा डंख दिवसेंदिवस तीव्र होत असून, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत डेंग्यूचे १२२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी तब्बल ७० रुग्णांची नोंद केवळ सप्टेंबरमध्ये झाली आहे.
त्यामुळे पावसाळ्याच्या अखेरीस शहरातील डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत आहे. महापालिकेच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (एनव्हीबीडीसीपी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या मासिक अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या १ हजार ५०३ वर पोहोचली. ऑगस्टमध्ये ही संख्या ९५७ होती.
म्हणजेच अवघ्या एका महिन्यात संशयित रुग्णांमध्ये ५४६ ने वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये ३७ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले होते. सप्टेंबरमध्ये हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. जूनपासून डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. जूनमध्ये २५२ संशयित रुग्णांपैकी २ जणांना, जुलैमध्ये ५८० पैकी १३ जणांना, तर ऑगस्टमध्ये ९५७ पैकी ३७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले.
सप्टेंबरमध्ये मात्र रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. दुसरीकडे जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ३ लाख ५७ हजार ८०३ तापाच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८ जणांना मलेरियाचे निदान झाले. सप्टेंबरमध्ये ४३ हजार ६७६ तपासण्यांमधून ८ रुग्ण आढळले. या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यूमुळे एकही मृत्यू नोंदवलेला नाही.
डेंग्यूचा वाढता आकडा लक्षात घेता नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावीत आणि तापाची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येणे आवश्यक आहे.





