Pune District : आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
Pune District : डॉ. दत्तात्रय वने यांनी कांदा पिकाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संकेत मोरे यांनी आच्छादन पद्धतीने कांदा लागवड करण्याचे फायदे स्पष्ट केले.

वरवंड : शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उत्पादन खर्च कमी व्हावा, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करता यावा आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी, या उद्देशाने संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स, पाटस येथे आयोजित करण्यात आलेला ‘कांदा आणि ऊस पीक परिसंवाद २०२६’ उत्साहात पार पडला. परिसंवादात कांदा व ऊस पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्थापन, सुधारित लागवड पद्धती, शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, जलव्यवस्थापन यांविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पुणे, सोलापूर, सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून ३०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
डॉ. दत्तात्रय वने यांनी कांदा पिकाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संकेत मोरे यांनी आच्छादन पद्धतीने कांदा लागवड करण्याचे फायदे स्पष्ट केले. पद्धतीत एकरी दोन लाखांहून अधिक कांदा रोपांची लागवड करून योग्य व्यवस्थापन आणि अनुकूल परिस्थितीत एकरी २० टन उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
जलतज्ज्ञ डॉ. विलास बगाटे यांनी पाण्यातील जडपणाची समस्या, व्यवस्थापन मार्गदर्शन केले. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, भारतचे सुशील माटे यांनी देशात विकसित होणाऱ्या विविध कृषी नवकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली. डॉ. विजय सांगळे यांनी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येऊ शकतो, याविषयी मार्गदर्शन केले. तालुका गुणनियंत्रण कृषी अधिकारी कैलास चव्हाण यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रगतशील शेतकरी महेंद्र थोरात यांनी शेतीविषयक अनुभव मांडले. यावेळी डॉ. संदीप घोले यांच्या जीवनप्रवासाची माहिती देणाऱ्या ‘sandipghole.nifo’ या संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आले. अमित बारवकर यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी डॉ. संदीप घोले यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी पाटसच्या माजी सरपंच अवंतिका शितोळे, पत्रकार अमरसिंह परदेशी, पत्रकार गुंदेजा, तुपे, बाळासो म्हस्के, गौतम मगर, गोविंद फाउंडेशनचे शेतकरी, संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्सचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संदीप प्याज बायो ऑरगॅनिक्स, डिजिटल खेती यांच्या वतीने केले. सूत्रसंचालन पूजा कड यांनी केले. डॉ. संदीप घोले यांनी आभार मानले.
कांदा बियाणे पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक
परिसंवादातील प्रमुख आकर्षण म्हणजे कांदा बियाणे पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक, कांदा रोपवाटिका, आधुनिक ऊस लागवडीचे प्रात्यक्षिक क्षेत्र हे होते. डॉ. संदीप घोले यांच्या शेतात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. पंजाब येथून आलेले यंत्रनिर्माते पवनीत सिंग यांनी कांदा बियाणे पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले.





