पुणे | जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिके

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आगीतून स्वतःची सुटका कशी करावी, आग आटोक्यात आणण्यासाठी वाळू, माती, पाणी आणि ओल्या कपड्यांचा वापर कसा करावा, प्रथमोपचार कसे द्यावेत, आग लागल्यावर घाबरून न जाता काय करावे, याबाबत अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात हा उपक्रम झाला. या वेळी स्थानिक अधिकारी प्रकाश गोरे, फायर इंजिन चालक गणेश ससाणे, मुख्य फायरमन संजय सकपाळ, फायरमन गणपत पडये, आकाश शिंदे, सूरज माने, ऋषिकेश गीते, आकाश किवळे, इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर या वेळी उपस्थित होते.
अग्निशमन दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये अग्निशमन उपकरणांच्या वापराबाबत आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये स्वतःला आणि इतरांना कसे वाचवायचे, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित करण्याचे मार्ग, काय करावे, करू नये, प्रथमोपचार कसे द्यावेत आदी माहिती देण्यात आली.





