लाहोर – पाकिस्तानातील लाहोर इथे महाराजा रणजीत सिंगांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. अलिकडच्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारे पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची ही तिसरी घटना आहे.
यापूर्वी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये महाराजा रणजीत सिंगांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. ही घटना घडल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून पुतळ्याची तोडफोड करण्यासाठी वापरण्यात आलेला हातोडादेखील जप्त करण्यात आला होता.
लाहोरमध्ये महाराजा रणजीत सिंग यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याचा भारतातील शिख संघटनांनी तीर्व निषेध केला आहे. पाकिस्तानातील कट्टरवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे, असे दिल्लीतील शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख मनजिंदर सिंग सिरसा यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानातील कट्टरवादी खादिम हुसैन रिझवी याच्या पक्षाच्या सदस्यांनी पुतळ्याची तोडफोड केली आहे. हे कृत्य करणाऱ्या दोषींवर पंतप्रधान इम्रान खान कठोर कारवाई करतील अशी अपेक्षाही सिरसा यांनी व्यक्त केली आहे.
हा प्रकार परराष्ट्र मंत्रालयाला कळवण्यात आला आहे आणि याबद्दल पाकिस्तानच्या दूतावासाकडे जाब विचारला जाईल, अशी ग्वाही आपल्याला परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जेपी सिंग यांनी दिली असल्याचेही सिरसा यांनी सांगितले.