Eknath Shinde : “लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत आहे” – एकनाथ शिंदे

Eknath Shinde : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन वेळप्रसंगी कायदा व लालफितीत न अडकता आवश्यकतेनुसार कायदे बदलण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवावी यासाठी संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या आयुधांचा वापर करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.
विधानपरिषद सभागृहात राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे लोकप्रतिनिधींची मतदार संघांप्रती असलेली जबाबदारी आणि त्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून उपलब्ध असलेले संविधानीक व्यासपीठ या विषयावर मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते.
मतदारसंघातील नागरिकांनी मला निवडून दिले. त्यामुळे मला त्यांच्यासाठीच काम करायचे आहे, ही भावना सतत जोपासण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या आयुष्यातील दु:ख कमी करून आनंदाने समाधान देण्यासाठी मिळालेल्या पदाचा पुरेपूर वापर करायला हवा.
जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे दु:ख कळायला हवे आणि ते सोडविण्यासाठी संविधानाच्या सर्व मार्गांचा अवलंब केल्यास मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचे जीवन सुसह्य होईल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यासाठी चांगला विद्यार्थी होणे आवश्यक :
लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत आहे. याच भावनेतून एक चांगला लोकप्रतिनिधी होण्यासाठी चांगला विद्यार्थी होणे गरजेचे आहे. मी आजही स्व:ताला विद्यार्थीच समजतो. लोकशाही प्रणाली लोकाभिमुख व्हावी अशी माझी कायम भुमिका आहे.
लोकशाही म्हणजे जनता आणि लोकप्रतिनिधी या दोघांमध्ये वाहणारी पवित्र गंगा आहे. ही विकासाची गंगा सदैव प्रवाहीत ठेवणे, प्रदूषित होऊ न देणे ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.





