Satara : माणमध्ये मिटिंगच्या नावाखाली अण्णांची गावाला हुलकवणी.

दहिवडी : ग्रामीण व्यवस्थेचा आत्मा असणारे ग्रामसेवकच माणमधील अनेक गावांना कधी कधी जातच नाहीत याबद्द्लची चर्चा माण तालुक्यातील अनेक प्रत्येक गावातून ऐकायला मिळत आहे.सरपंच व सदस्य यांच्या निर्णयांनुसार गावातील नागरिकांना वेळेवर सोयीसुविधा मिळण्यासाठी ग्रामसेवकाने तत्पर राहून सेवा पुरवायची असते.
परंतु, ग्रामीण व्यवस्थेचा हा सेवेकरी नागरिकांची दिशाभूल करून मीटिंगच्या नावाखाली कधी कधी दांडी मारत असल्याचे नागरिक सांगत आहेत. पंचायत समितीच्या दहिवडी कार्यालयात मीटिंग आहे, जिल्हा परिषदेची सातारा येथे मीटिंग आहे, ट्रेनिंगसाठी बाहेरगावी आलोय. तीन गावांचे चार्ज माझ्याकडे असल्यामुळे मी आज दुसऱ्या गावाला आलोय, असे तिन्ही गावांच्या लोकांना सांगून अण्णासाहेब मात्र कुठे असते तिन्ही गावांतील लोकांना समजत नाही.
अण्णासाहेब कुठे आहेत ते गावच्या सरपंचांना मात्र नक्की माहीत असते. परंतु, अलीकडच्या काळामध्ये पंधरा वित्त आयोगाचा निधी येऊ लागला तेव्हापासून सरपंच आणि ग्रामसेवकांची मैत्री अधिक घट्ट बनली आहे. अण्णासाहेबांच्या बोगस मीटिंगमुळे नागरिकांचे अनेक कागदपत्रांची कामे रेंगाळत पडत आहेत.
नागरिक मात्र अण्णासाहेबांच्या मिटींगची चौकशी न करता अण्णासाहेब उद्या येतील या अपेक्षेवर बसून राहतात. ग्रामसेवकांच्या दांडी मारण्याच्या या प्रक्रियेला चाप बसावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे..
नागरिकांनी तक्रार करावी…
कोणत्या गावातील ग्रामसेवक मिटींगचे व ट्रेनिंगचे कारण सांगून ग्रामपंचायतीमध्ये येत नसेल व दांडी मारत असेल तर अशा ग्रामसेवकाची चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्या ग्रामसेवकावर कडक कारवाई करू. त्यासाठी ग्रामस्थांनी अशा ग्रामसेवकाची फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात तात्काळ आमच्याकडे तक्रार करावी.
– प्रदीप शेंडगे (गट विकास अधिकारी, माण)





