नागपूर : वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. तो पूर्ण महाराष्ट्राचाच भाग आहे. सध्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मात्र ते विदर्भातून येतात, तरी देखील वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निघत असेल तर आता महाराष्ट्र अखंड ठेवणार की तुकडे होणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी स्पष्ट व ठाम भूमिका उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शुक्रवारी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आमच्या अजेंड्यावर असल्याचे म्हटले आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यावरुन त्यांनी सत्ताधारी भाजपवर पुन्हा एकदा निशाना साधला. नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असूनही अद्याप विदर्भाच्या वाट्याला काहीही आलेले नाही. हिवाळी अधिवेशन हे नागपूर आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही. याउलट, आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुंबईसह इतर महापालिकांसाठी निधीची घोषणा करण्यात येत आहे. त्यामुळे या अधिवेशनातून नागपूर-विदर्भाला काय दिले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांचे दोन सहकारी असलेल्या नगरविकास आणि अर्थमंत्री यांनी द्यावे, असे आवाहन देखील ठाकरेंनी केले. सभापतींची भेट दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलताना ते म्हणाले,आम्ही दोन्ही सभापतींना विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची विनंती केली आहे. त्यांनी देखील लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. जर, संख्याबळ वा कुठल्या नियमाची आडकाठी येत असेल तर असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्रिपददेखील रद्द करायला हवे, अशी आमची मागणी असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.