Santosh Deshmukh Case : वडिलांना न्याय मिळवून द्या.. संतोष देशमुखांच्या लेकीने केल्या भावना व्यक्त

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. या मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. या मोर्चामधून सर्वांनी मनोगत व्यक्त केली.
वैभवी देशमुखने व्यक्त केल्या भावना
यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आपल्या भावना मोकळ्या करुन दिल्या. वडिलांना न्याय मिळवून द्या अन् असा प्रकार पुन्हा कोणत्याही कुटुंबाबाबत होऊ नये असे ती म्हणाली. पुढे ती म्हणाली माझा वडिलांचा जन्म येथेच झाला होता. त्याच ठिकाणावरुन मी तुम्हा सर्वांना विनंती करते माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे.
तुम्हा सर्वांना सांगते माझ्या वडिलांची हत्या कशाप्रकारे झाली? हे तुम्हाला माहीत आहे. त्यांचा काहीच गुन्हा नसताना त्यांची हत्या झाली. ते नेहमी समाजासाठी झुंजत होते. समाजाचे काम करत होते. हत्येच्या दिवशीसुद्धा ते दुसऱ्यासाठी लढत होते. त्या दिवशी माझी वडील दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करण्यासाठी गेले होते. त्या व्यक्तीला मदत करत असताना त्यांची हत्या करण्यात आली असे वैभवी देशमुख म्हणाली.
तसेच आज माझ्यावर ही वेळ आली. ती वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये. मला माहीत आहे आता माझे वडील आता मला कधीच दिसणार नाही. परंतु वडिलांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुम्ही सर्वांनी एकत्र या. माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. हा लढा आपण सर्वांनी एकत्र लढवून पुढे नेऊ. हा अन्याय पुन्हा होऊ देऊ नये. आज तुम्ही मोठ्या संख्येने माझ्यासोबत आहात, तसेच नेहमीच माझ्यासोबत राहा असे ती म्हणाली.
आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे
या प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील बाकी आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी असेदेखील वैभवी म्हणाली.
‘त्या’ दिवशी नेमके काय घडले?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.
देशमुख प्रकरणातील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे
केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिन्ही गुन्हे आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडीकडे) वर्ग करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.





