डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टेरिफ’ धोरणाची चौकशी करण्याची मागणी

वॉशिंग्टन – गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात सुरू जाहीर करून सर्व जगाला वठीस धरले होते. जगातील बहुतांश देशाविरोधात आयात शुल्क जाहीर करून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती. त्यानंतर अमेरिकेसह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब गुंतवणूकदारांचे अतोनात नुकसान झाले. असे असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीला अचानक स्थगिती दिली. स्थगितीअगोदर चार तास त्यांनी समाज माध्यमावर स्वतःच्या नावानिशी ‘खरेदी’ करण्याची ही उत्तम वेळ आहे अशी पोस्ट केली. चार तासानंतर स्थगितीचा निर्णय झाला. आणि शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले.
या चार तासाच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या देणगीदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून नफा मिळवला. हा एक प्रकारे इनसाईडर ट्रेडिंगचा प्रकार असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होत असून अमेरिकेत बर्याच तज्ञांनी आणि राजकीय नेत्यांनी ट्रम्प यांच्या या धोरणाची चौकशी करावी अशी मगणी केली आहे.
ट्रम्प यांनी जाणून-बुजून निर्देशांकावर परिणाम करणारे वक्तव्य आणि कृती केली. त्यामुळे ट्रम्प यांच्या मित्रांचा अब्जावधी डॉलरचा फायदा झाला. इतर गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले, असे अमेरिकेतील सिनेटर एलिझाबेथ बॅरेन यांनी म्हटले आहे.
शेअर बाजाराचे निर्देशांक कमी -जास्त करण्यासाठी ठरवून असा प्रकार केला असे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराची औपचारिक चौकशी होण्याची गरज आहे. ट्रम्प यांच्याशी संबंध असलेल्या लोकांना स्थगितीच्या निर्णयाची माहिती होती. त्याचबरोबर स्वतः ट्रम्प यांनी सोशल मीडियावर स्थगिती अगोदर चार तास खरेदी करण्याचा सल्ला कसा काय दिला. हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे असे त्यांनी सांगितले.
अमेरिकेत बुधवारी सकाळी निर्देशांक अस्थिर होते. अशातच सकाळी 9.37 वाजता ट्रम्प यांनी सध्याची वेळ खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम आहे असे डीजेटी या स्वतःच्या संक्षिप्त नावाने समाज माध्यमावर सांगितले. त्यानंतर चारच तासानी त्यांनी आयात शुल्क धोरण स्थगित करण्यात आले असल्याचे सांगितले. परिणामी एस अँड पी 500 हा निर्देशांक 9.5 टक्क्यांनी वाढला व कंपन्यांचे बाजार मूल्य चार लाख कोटी डॉलरने वाढले. यामुळे या अगोदरच्या चार दिवसात झालेल्या नुकसानीची 70 टक्के झीज भरून निघाली.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ईलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग इत्यादी त्यांच्या देणगीदारांचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. अमेरिकेतील गुंतवणूकदाराबरोबरच जागतिक गुंतवणूकदारांचे या आठवड्यामध्ये अब्जावली डॉलरचे नुकसान झाले. त्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्याला आगामी काळात किती महत्व द्यायचे याबाबत फेर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.





