Pimpri : लग्नसराई,मार्गशिर्षमुळे फुलांना मागणी

पिंपरी : सध्या लग्नसराई सुरू असून, मार्गशीर्ष महिनादखील सुरू झाला आहे. पहिल्या गुरुवारपासून घरोघरी लक्ष्मी देवीची पूजा करण्यात येते. लक्ष्मीच्या पूजेसाठी लागणार्या फुलांना सध्या मोठी मागणी आहे. त्यामुळे फुलांचे दर देखील काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे फूलविक्रेते व उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
नवरात्रात ज्याप्रमाणे घरोघरी घटस्थापना करून देवीची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. या लक्ष्मीच्या पूजेसाठी फुलांचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे फूल उत्पादकांसाठी दसरा-दिवाळी, गणेशोत्सवाप्रमाणेच मार्गशीर्ष महिना ही चांगला हंगाम मानला जातो.
या महिन्यामध्ये पिवळ्या फुलांना विशेष मागणी असते. विशेष करून शेवंतीला चांगली मागणी असते. त्यामुळे मार्गशीर्ष महिना डोळ्यासमोर ठेवून शेतकरी फुलांचे पीक घेतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही फुले बाजारात व्रिक्रीसाठी दाखल झाली आहेत.
त्या प्रमाणात बाजारात फुलांची मागणी देखील वाढू लागली आहे.मागील आठ दिवासांपासून पिवळ्या फुलांचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. महिनाभर या फुलांना मागणी कायम राहणार असून, दर देखील चांगले राहणार असल्याचा अंदाज फूल विक्रेत्यांनी सांगितले.





