Online shopping: डिलिव्हरी बॉयचा जिवाशी खेळ ! दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त पार्सल, वेळेवर पोहण्याची वेगवान स्पर्धा
Online shopping: अपघाताचा धोका वाढला, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात ऑनलाइन खरेदीचा वाढता कल आणि सण-उत्सवांच्या काळातील वाढती मागणी यामुळे डिलिव्हरी सेवांवरील कामाचा ताण वाढत आहे. ग्राहकांना ठरलेल्या वेळेत वस्तू पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉय दिवसभर दुचाकीवरून शहराच्या विविध भागांत फिरत असतात. मात्र काही वेळा दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त आणि मोठ्या आकाराची पार्सल वाहून नेली जात असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. तसेच वेळेवर पोहचण्यासाठी आणि सर्व पार्सल डिलिव्हर करण्यासाठी दुचाकीचा वाढता वेग चिंतेची बाब बनत आहे.
शहरातील ऑनलाइन वितरण व्यवस्थेत डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्राहकांनी मागविलेल्या वस्तू वेळेत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यासाठी त्यांना गर्दीचे रस्ते, अरुंद गल्लीबोळ, चौक आणि वर्दळीच्या मार्गांवरून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत दुचाकीवर वजनदार किंवा अवजड पार्सल असल्यास वाहन चालविताना अधिक सावधगिरी बाळगावी लागते. मात्र पार्सलची संख्या आणि वजन वाढल्यास सुरक्षितपणे वाहन चालविणे आव्हानात्मक ठरते.
सोबतच दुचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त सामान ठेवल्यास वाहनाचा समतोल राखण्यात अडचणी येऊ शकतात. विशेषतः मागील बाजूस मोठी पार्सल बांधलेली असल्यास वळण घेताना किंवा अचानक ब्रेक लावताना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. पार्सल योग्य पद्धतीने बांधलेले नसल्यास ते एका बाजूला सरकण्याची किंवा रस्त्यावर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शहरातील वाहतुकीत अचानक समोर येणारी वाहने, रस्त्यावरील खड्डे आणि गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना करावा लागतो. या प्रकारामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याबरोबरच इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
सणासुदीत वाढतो कामाचा ताण
दिवाळी, गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती साहित्य तसेच भेटवस्तूंच्या ऑनलाइन मागणीत वाढ होते. परिणामी डिलिव्हरी कर्मचाऱ्यांकडे येणाऱ्या पार्सलची संख्या वाढण्याची शक्यता असते. एका दिवसात अधिकाधिक ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचविण्याचे नियोजन करताना कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन पाळावे लागते. त्यामुळे या कामात वेगापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सामानाचे वजन, आकार आणि वाहनाची क्षमता यांचा विचार करूनच वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
कंपन्यांच्या जबाबदारीकडे लक्ष देण्याची गरज
डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित ऑनलाइन कंपन्या आणि वितरण सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुचाकीवरून किती वजन आणि कोणत्या आकाराचे सामान वाहून नेता येईल, याबाबत स्पष्ट नियम असावेत.
पार्सलची संख्या अधिक असल्यास अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करणे किंवा योग्य पर्यायी वाहनांचा वापर करणे आवश्यक ठरू शकते. कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाहनचालना, पार्सल बांधण्याची योग्य पद्धत आणि वाहतूक नियमांबाबत नियमित मार्गदर्शन देणेही गरजेचे आहे. ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडताना कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची काळजी कंपन्यांनी घेतली पाहिजे.





