नवी दिल्ली – दक्षिण-पश्चिम दिल्लीतील आर के पुरम भागात रविवारी पहाटे दोन महिलांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रकार घडला आहे. घटनेच्या काही तासांतच मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की, त्यांना सकाळी 4.40 च्या सुमारास मृत महिलांच्या भावाचा फोन आला की आंबेडकर बस्तीमध्ये त्यांच्या बहिणींवर गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून त्यांना रूग्णालयात दाखल केले परंतु त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पिंकी (30) आणि ज्योती (29) अशी मृतांची नावे आहेत. प्राथमिक तपासानुसार असे समोर आले आहे की मृत महिलांच्या भावाचे हल्लेखोरांशी आर्थिक कारणांवरून वाद होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.