Delhi Red Fort News – दिल्ली येथे झालेल्या स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) अजून एक यश मिळाले असून आत्मघातकी बॉम्बर डॉ. उमरच्या एका सहकाऱ्याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड भागातील रहिवासी आहे. एनआयएच्या तपासामध्ये धक्कादायक खुलासे समोर आले असून, एनआयएने जसीरवर दहशतवादी हल्ल्यांसाठी तांत्रिक मदत पुरवल्याचा ठपका ठेवला आहे. जसीरने हल्ल्यांमध्ये वापरण्यासाठी ड्रोनमध्ये बदल केले होते. तसेच तो रॉकेट तयार करण्याचा देखील प्रयत्न करत होता. त्याने बॉम्बस्फोट घडविणाऱ्या उमर उन नबीला सहकार्य करत हल्ल्याची तयारी केली असल्याचे तपासामध्ये दिसून आले आहे. तसेच जसीरने तांत्रिक मदतीच्या बरोबरीने संपूर्ण हल्ल्याच्या नियोजनात देखील सक्रिय सहभाग घेतला होता. तो उमर उन नबीचा विश्वासू सहकारी असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये तो सहभागी होता. दरम्यान, एनआयएने रविवारी आमीर रशीद अलीला अटक केली होती. तो देखील मूळ काश्मीर येथील असून स्फोटांमध्ये वापरण्यात आलेली कार रशीद अलीच्या नावावर नोंदणीकृत होती. आमीर रशीद अलीला न्यायालयासमोर हजर केले असता १० दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.