दिल्ली दंगल प्रकरणी उमर खालिदचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली – ईशान्य दिल्लीतील दंगलीप्रकरणी तुरुंगात असलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदचा जामीन अर्ज करकरडूमा न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांनी उमर खालिदला यूपीपीए अंतर्गत अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी उमर खालिदला मुख्य सूत्रधार म्हणून अटक केली होती.
उमर खालिद अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपचा भाग असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात सांगितले होते. ज्याद्वारे हिंसाचाराचा कट रचला गेला. उमरने लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केले होते. इतकेच नाही तर जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत आले होते, तेव्हा उमर याने लोकांना रस्त्यावर येण्यास सांगितले होते. जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळू शकेल.
उमर खालिदने हिंसाचाराचा कट रचण्यासाठी इंडिया अगेन्स्ट हेटशी संबंधित आप काऊन्सिलर ताहिर हुसैन आणि खालिद सैफी यांच्यासोबतही बैठक घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते. कोर्टात युक्तिवाद करताना उमर खालिदच्या वतीने सर्व आरोप खोटे आणि बनावट असल्याचे सांगण्यात आले.
उमरच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते की, कोणत्याही मुद्द्यावर आवाज उठवणे हा गुन्हा नाही. उमर खालिद हा व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये होता. मात्र तो त्या गटांमध्ये सक्रिय नव्हता. अशा स्थितीत त्याचे मौन त्याला आरोपी सिद्ध करते का?
दरम्यान, ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या हिंसाचारात 53 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.





