दिल्ली: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रामलीला मैदानात रावण दहन

नवी दिल्ली : दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात उत्साह आहे. यावेळी दिल्लीच्या लाल किल्ल्याला लागून असलेल्या रामलीला मैदानात रावण दहन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक साहित्यापासून रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाचे पुतळे तयार करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले पीएम मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी सर्वप्रथम मंचावर पोहोचून भगवान राम आणि लक्ष्मण यांच्या भूमिका साकारणाऱ्या तरुणांना टिळा लावून त्यांची पूजा केली.
राम आणि रावणाचे युद्ध –
रावण दहन सोहळ्यापूर्वी राम आणि रावणात युद्ध झाले. रामाने रावणाच्या नाभीत बाण मारून वध केला. यानंतर रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले.
विजयादशमी का साजरी केली जाते?
हिंदू समाजात विजयादशमी या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हा सण नवरात्रीच्या 9 दिवसांनंतर दशमीच्या दिवशी येतो. या दिवशी देशातील प्रत्येक राज्यात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.
हा दिवस वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर चांगुलपणाचा विजय म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात असे मानले जाते की त्रेतायुगात भगवान रामाने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला. म्हणून हा दिवस भगवान रामाच्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.





