Race Course Mosque : दिल्ली रेस कोर्स मशिदीवर कारवाईला तूर्तास ब्रेक; केंद्र आणि वक्फ बोर्डाला हायकोर्टाची नोटीस
Race Course Mosque : दिल्ली रेस कोर्स क्लब परिसरातील मस्जिदीच्या कथित तोडफोडीच्या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकार आणि वक्फ बोर्डाला नोटीस बजावली. पुढील सुनावणीपर्यंत कारवाई न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Race Course Mosque : दिल्लीतील रेस कोर्स क्लब परिसरातील मशिदीच्या कथित पाडकामाच्या मुद्द्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली वक्फ बोर्डाकडून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणीपर्यंत मशिदीवर कोणतीही तोडफोड केली जाणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.
मशिदीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्याने तसेच वीज आणि पाणीपुरवठा बंद केल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला. यामुळे नमाजासाठी येणाऱ्या लोकांना अडचणी येत असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.
न्यायमूर्ती अनीश दयाल यांच्या खंडपीठाने मंगळवारी केंद्राच्या भूमी व विकास कार्यालयाला (एल अँड डीओ) आणि दिल्ली वक्फ बोर्डाला नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
याचिकाकर्ते सैयद अहमद सऊद यांच्या वकिलांनी मशीद पाडण्याची शक्यता असल्याचे न्यायालयात सांगितले. तसेच मशीद 1977 पासून सरकारी गॅझेटमध्ये वक्फ मालमत्ता म्हणून नोंद असल्याचा दावा करण्यात आला. 1 ऑक्टोबर 2009 च्या अधिसूचनेनुसार तिला ग्रेड-2 वारसा दर्जा मिळाल्याचेही सांगण्यात आले.
Delhi High Court Issues Notice On Plea To Protect Race Course Masjid, Centre Assures No #Demolition Till Next Hearing
https://t.co/sIdHMYRAF6— Live Law (@LiveLawIndia) October 27, 2026
दरम्यान, वक्फ बोर्डाने 19 ऑक्टोबरला भूमी व विकास कार्यालय आणि इतर अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे बोर्डाच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
केंद्र सरकारच्या वकिलांनी रेस कोर्स परिसरातील सुरू असलेल्या तोडफोडीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मशिदीचा वीज-पाणीपुरवठा बंद केल्याचे सांगितले. परिसरात एक मंदिरही असल्याची माहिती त्यांनी दिली.




