Delhi Election: ‘दिल्ली दंगलींचा पोस्टरबॉय’ लढणार विधानसभा; ‘या’ पक्षाकडून तिकिट मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले असून हैदराबाद येथील असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्षही दिल्लीच्या रिंगणात उतरणार आहे. १० उमेदवारांना दिल्लीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतला आहे. विशेष म्हणजे दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी शाहरूख पठाण यालाही तिकिट दिले जाण्याची शक्यता आहे.
दंगलीच्या वेळी याच शाहरूख पठाणने तो जमावात उभा असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखली होती. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती. आता त्यालाही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
दरम्यान, एमआयएमचे दिल्ली शाखेचे अध्यक्ष शोएब जमई यांनी अलिकडेच शाहरूख पठाणच्या घरी भेट दिली होती. त्याच्या कुटुंबीयांची जमई यांनी भेट घेतली होती. एवढेच नाही तर जमई यांनी शाहरूखच्या आईसोबत बोलतानाचे फोटोही सोशल मीडियावर टाकले होते. त्यामुळे सीलमपूर विधानसभा मतदारसंघातून शाहरूखला पक्षाकडून रिंगणात उतरवले जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
एका दूरचित्रवाहिनीने जमई यांनाही याबाबत प्रश्न विचारला होता, मात्र त्यांनीही शाहरूखला उमेदवारी देण्याबाबत काही उत्तर दिले नसले तरी या शक्यतेचा त्यांनी इन्कारही केला नाही. उमेदवारीबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, आपण दिल्लीत केवळ आपले काम करत असल्याचे ते म्हणाले. सीलमपूरच्या जनतेला त्यांचा आवाज उठवू शकेल असा दमदार उमेदवार हवा आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.




