दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपची ‘जमवाजमव’; आप आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची ‘पळवापळव’ सुरू

नवी दिल्ली – आम आदमी पार्टीच्या पाच नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पार्टीत दाखल होणे ही दिल्लीच्या राजकारणातील मोठी घडामोड मानली जाते आहे. दिल्ली महापालिकेच्या सगळ्यांत महत्वाच्या वॉर्डमध्ये आणि स्थायी समितीच्या महत्वाच्या निवडणुकीच्या अगोदर हा प्रकार घडला आहे.
रामचंद्र, पवनकुमार, मंजू देवी, सुगंधा आणि ममता ही त्या नगरसेवकांची नावे आहेत. पुढील चार ते पाच महिन्यांच्या आत दिल्लीत विधानसभा निवडणूक होणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून आम आदमी पार्टी कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अडचणीत आहे, कारण पक्षाच्या बहुतेक प्रमुख नेत्यांना तुरूंगवारी करावी लागली आहे.
त्यासोबतच राज्यसभेच्या सदस्या आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल प्रकरणही आपच्या मुळावर आले आहे. लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील एकही जागा पक्षाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता नेत्यांची अशी गळती सुरू झाल्यामुळे आप अडचणीत आहे.
गेल्याच महिन्यात पक्षाचे आमदार करतार सिंह तंवर यांच्यासोबत नगरसेवक उमेश सिंह फोगट, माजी मंत्री राजकुमार आनंद, माजी आमदार वीणा आनंद यांच्यासह अन्यही काही आपचे नेते भारतीय जनता पार्टीत दाखल झाले आहेत.
कॉंग्रेसलाही दिला झटका
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेसचे माजी दिल्ली अध्यक्ष आणि शीला दीक्षित सरकारमधील मंत्री अरविंदर सिंग लवली यांना आपल्या पक्षात दाखल करून भाजपने कॉंग्रेसला झटका दिला होता. शीला दीक्षित सरकारमधील आणखी एक मंत्री राजकुमार चौहान, माजी आमदार नसीब सिंह, नीरज बसोया, दिल्ली युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अमित मलिक आदी नेतेही कॉंग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीची सत्ता मिळवायचीच असा भाजपचा प्रयत्न आहे तर पुन्हा एकदा दिल्ली आपल्याकडेच राखण्यासाठी आम आदमी पार्टीनेही ताकद लावली आहे.
आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात जो कलह सुरू आहे त्यामुळे गेल्या १८ महिन्यांपासून दिल्लीत वॉर्ड कमिट्यांची निवडणूक झालेली नाही. आता आपचे पाच नगरसेवक भाजपने पळवले आहे. अन्य नगरसेवकही तोच कित्ता गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जेमतेम काठावर बहुमत असलेल्या आपला महापालिकेतही आता आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.





