– वंदना बर्वे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आहेत, तर राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. आता प्रियंका गांधी यांचेसुद्धा संसदेत आगमन झाले आहे. अशाप्रकारे काँग्रेसचे तीन सदस्य आता संसदेत बघायला मिळतील. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात होत आहे. हे 18व्या लोकसभेचं तिसरं आणि पहिलं हिवाळी अधिवेशन होय. 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार्या या अधिवेशनात सरकारकडून 15 विधेयके मांडली जाणार आहे. सरकारच्यादृष्टीनं यातील सर्वात महत्त्वाचं विधेयक म्हणजे वक्फ संशोधन विधेयक. यास पारित करण्यासाठी सरकारकडून पूर्ण जोर लावला जाणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं पानिपत झालं आहे. मात्र, या पराभवाचा कोणताही परिणाम संसदेच्या अधिवेशनातील परफॉर्मसवर होऊ द्यायचा नाही असं ठरविण्यात आलं आहे. यामुळे हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर गोंधळ बघायला मिळू शकतो. विरोधी पक्षांच्या हातात सरकारला घेरण्यासाठी तीन-तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. यातील पहिला म्हणजे अमेरिकन सरकारने उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरूद्ध दाखल केलेला एफआयआर, दुसरे, वक्फ संशोधन विधेयक आणि तिसरे, सेबीच्या प्रमुख माधवी बुच. या तिन्ही प्रकरणांना धार लावली जात असून यासाठी काँग्रेसने आपल्या बुद्धिमान खासदारांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर मनीष तिवारी, शशी थरूर आणि गौरव गोगोई हे काँग्रेसचे नेते अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी करीत आहेत. भाजपप्रणित महायुतीने महाराष्ट्र तिसर्यांदा फत्ते केला आहे, तर झारखंड मुक्ती मोर्चाने झारखंडची सत्ता आपल्याकडे कायम राखली आहे. याशिवाय, 14 राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही संमिश्र लागले आहेत.पश्चिम बंगालमधील सर्व सहा जागांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळविला आहे. राजस्थानमध्ये भाजपने सातपैकी पाच जागा जिंकल्या आहेत. यातील तीन जागा काँग्रेसच्या ताब्यात होत्या. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसच्या ताब्यातील तीन जागा जिंकल्या. आप आता पंजाबमधील 94 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनला आहे. मध्यप्रदेशातील वनमंत्री रामनिवास विजयपूर यांचा पराभव झाला आहे. बुधनीची जागा भाजपने जिंकली असली तरी विजयाचे अंतर मात्र 87 टक्क्यांनी घटले आहे. उत्तरांखडची केदारनाथ जागा भाजपने जिंकली आहे. छत्तीसगडच्या रायपूर दक्षिणची जागा भाजपने लागोपाठ नवव्या वेळा जिंकली आहे. आसाममध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे. जवळच्या चार जागा कायम राखत भाजपने काँग्रेसची एक जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला आहे. तर एक जागा भाजपला आणि एक जागा जेडीएसला मिळाली आहे. केरळमधील दोनपैकी एक जागा काँग्रेसने तर दुसरी जागा एलडीएफने जिंकली आहे.महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केरळच्या वायनाडमधून चार लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळविला आहे. आता संसदेत गांधी कुटुंबातील तीन सदस्य झाले आहेत. प्रियंका गांधी यांच्या खासदारकीची सुरुवात संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून होत आहे. अशात, लोकसभेतील त्यांच्या परफॉर्मसकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. प्रियंका गांधी यांचा विजय राहुल गांधी यांनी मिळविलेल्या विजयापेक्षाही मोठा आहे, हे येथे उल्लेखनीय. ‘आतापर्यंत मी आई आणि भाऊ यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत होती. मात्र आता पहिल्यांदाच स्वतःसाठी मतं मागत आहे’, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी वायनाड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले होते. प्रियंका गांधी यांनी हा विजय 4 लाख 10 हजार 931 मते मिळवून मिळविला आहे. त्यांनी संसदेत पाऊल ठेवल्यानंतर आता गांधी कुटुंबातील तीन सदस्य एकत्र संसदेत असतील. काँग्रेस पक्ष कठीण परिस्थितीतून जात असून त्याला बाहेर काढण्यात त्या यशस्वी होतील काय? अशी चर्चासुद्धा रंगली आहे. खरे तर प्रियंका गांधी यांचा संसदेत प्रवेश अशा वेळी होत आहे जेव्हा महाराष्ट्रात पानिपत झाले आहे आणि त्यापूर्वी हरियाणातही पराभवाचे तोंड बघावे लागले आहे. लोकांशी संपर्क साधणे आणि गर्दीतही लोकांशी उत्तम संवाद साधण्यात त्यांचा हतखंडा बघायला मिळतो. तसं बघितलं तर, प्रियंका गांधी या मागील दोन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, आई आणि भावाच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन एवढ्यापुरतेच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवले होते. आपल्याला राजकारणात येण्यासाठी बराच वेळ लागू शकतो असं त्यांनी सप्टेंबर 1999 मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. हे खरं सुद्धा आहे. तब्बल 20 वर्षांनंतर अर्थात 2019 मध्ये त्यांनी पक्षाच्या महासचिव म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि त्यानंतर आता पाच वर्षांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू होत आहे. प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवासाबाबत सांगायचं झालं तर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आई सोनिया गांधी यांच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन केले होते. 23 जानेवारी 2019 रोजी काँग्रेसचे औपचारिकपणे सरचिटणीस पद स्वीकारून राजकारणात प्रवेश केला आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी बनल्या. 11 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना संपूर्ण उत्तर प्रदेशचे सरचिटणीस प्रभारी बनवण्यात आले. 2022 मध्ये काँग्रेसने प्रियंकाच्या नेतृत्वाखाली यूपी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्या जोरदार प्रचारानंतरही राज्यात काँग्रेसला केवळ दोन जागांवर यश मिळाले. वायनाडमधील निवडणुकीदरम्यान प्रियंका गांधी यांनी मतदारांना भावनिक साद घातली. त्या म्हणाल्या की, मी प्रथमच स्वतःसाठी मत मागत आहे. याचा मोठा परिणाम झाला आणि मतदारांनी त्यांच्या पदरात भरभरून मते टाकली. प्रियंका वायनाडच्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि समृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. प्रियांकाचा संसदेत प्रवेश एका नव्या युगाला जन्म देईल. प्रियंका गांधी यांनी विजयाच्या घोषणेसोबतच वायनाडच्या जनतेचे आभार मानले. संसदेत मी आपला आवाज बनेल, असे आश्वासनही दिले. काँग्रेस खासदार राहुल गांधी अतिशय धाडसी आहेत आणि त्यांनी प्रत्येक पावलावर दिलेल्या सहकार्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे, सध्या प्रियंका गांधी यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘वायनाडच्या लोकांनी खरोखर त्यांची काळजी असलेल्या एका व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठविले आहे असे आपल्याला वाटेल याची मी हमी देते आहे. वायनाडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही निवडलेल्या व्यक्तीला तुमच्या आशा आणि स्वप्नांची जाणीव आहे आणि ती तुमच्यासाठी लढणार आहे. संसदेत तुमचा आवाज होण्यासाठी मी उत्सुक आहे’. त्या पुढे म्हणाल्या, ‘मला हा सन्मान दिल्याबद्दल आणि त्याहीपेक्षा तुम्ही मला दिलेल्या अपार प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभार.’ निवडणुकीत अतुलनीय मेहनत घेतल्याबद्दल त्यांनी केरळमधील यूडीएफच्या सहकार्यांचे, नेते, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांचे आभार मानले.प्रियंका गांधी यांनी पुढे लिहिले की, ‘माझा भाऊ राहुल, तू या सगळ्यात सर्वात धाडसी आहेस. मला मार्ग दाखवल्याबद्दल आणि मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.’