नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात असलेल्या हुमायूँच्या मकबऱ्याजवळील एका खोलीची भिंत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काहीजण जण ढिगाऱ्याखाली दबले गेले, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (15 ऑगस्ट 2025) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. हुमायूँचा मकबरा हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असून, 16व्या शतकातील मुघलकालीन स्मारक आहे, जिथे जगभरातून पर्यटक भेट देतात. बचावकार्य सुरू प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 4:30 वाजता अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. दिल्ली अग्निशमन दल (DFS) आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली.बचाव पथके अजूनही घटनास्थळी कार्यरत आहेत. पोलिसांचे निवेदन दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन परिसरातील हुमायूँच्या मकबऱ्याजवळ असलेल्या दरगाह शरीफ पट्टे शाह येथील एका खोलीची छत कोसळला. यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तपास आणि बचाव कार्य करत आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. आतापर्यंत 11 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हुमायूँचा मकबरा हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. 16व्या शतकातील हे मुघलकालीन स्मारक असून, येथे जगभरातून पर्यटक भेट देतात. सध्या या दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.