Gov Scheme: आता ‘या’ सरकारने केली ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा, महिलांना देणार 2100 रुपये

नवी दिल्ली: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध योजनांचा घोषणा केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा महायुतीला फायदा झाल्याचे पाहायला मिळाले होते. या योजनेचा फायदा पाहून आता दिल्ली सरकारकडून देखील महिला केंद्रित योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारने महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आणि आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी याबाबत घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरमहिना 2100 रुपये दिले जाणार आहेत. योजनेची घोषणा आता करण्यात आली असली तरीही, पैसे मात्र निवडणुकीनंतर दिले जाणार आहेत.
या योजनेची माहिती देताना केजरीवाल म्हणाले की, कॅबिनेटने महिला सन्मान योजनेला मंजूरी दिली आहे. याची नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होईल. निवडणुकीची घोषणा पुढील 10-15 दिवसात होणार असल्याने त्वरित पैसे देणे शक्य नाही. या योजनेची रक्कम 1 हजार रुपयांवरून 2100 केली जाणार आहे.
या महिलांना मिळणार फायदा
ज्या महिला कर भरण्यास पात्र नाही व सरकारच्या अन्य कोणत्याही योजनांचा लाभ घेत नाहीयेत, त्यांना योजनेचा फायदा मिळेल. आप पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांच्या घरी जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतील. तसेच, सध्या 1 हजार रुपये असलेली रक्कम निवडणुकीत विजयी झाल्यानंतर वाढवून 2100 रुपये केली जाईल.
दरम्यान, दिल्ली सरकारने मार्च 2024 मध्ये या योजनेची घोषणा केली होती. भाजपच्या नेत्यांकडून देखील दिल्ली महिलांना 2100 रुपये दिले जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. या योजनांमुळे निवडणुकीत झालेला फायदा लक्षात घेऊन आता विविध राजकीय पक्षांकडून याची अंमलबजावणी केली जात आहे.





