CJI Surya Kant : दिल्ली मेट्रोची 57 स्थानके बंद; CJI सूर्यकांत संतापले, म्हणाले- ‘सगळं बंद करता येणार नाही, लगेच काहीतरी करा!’
CJI Surya Kant : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोची 57 स्थानके बंद करण्याच्या निर्णयावर CJI सूर्यकांत यांनी चिंता व्यक्त केली. मेट्रो पूर्णपणे बंद न करण्याचे निर्देश दिले.

CJI Surya Kant : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) शनिवारी जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोची 57 स्थानके बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दिल्लीकडे जाणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सरकारच्या निर्णयाचा मुद्दा उपस्थित केला. मेट्रो सेवा बंद करणे आणि रेल्वेगाड्या रद्द करणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.
यावर सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी चिंता व्यक्त केली. “सगळं बंद करता येणार नाही. मेट्रोच्या फेऱ्या कमी करता येईल; मात्र सेवा पूर्णपणे बंद करू नका. आम्हाला याबाबत चिंता आहे. सरकारने तातडीने काहीतरी करावे,” असे त्यांनी म्हटले.
मेट्रोवर दररोज अवलंबून असलेल्या विद्यार्थी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले. ग्रेटर नोएडा आणि दक्षिण दिल्लीहून कामासाठी येणाऱ्या हजारो लोकांचे काय, असा सवाल त्यांनी केला. वकिलांकडे स्वतःची वाहने असू शकतात; मात्र क्लर्क आणि इतर सामान्य कर्मचाऱ्यांचे काय, असा प्रश्नही CJI सूर्यकांत यांनी उपस्थित केला.





