Delhi MCD Elections 2022 : काम केले असते तर सगळे मुख्यमंत्री प्रचारासाठी आणावे लागले नसते – केजरीवाल

नवी दिल्ली – दिल्लीत महापालिकेने आत्तापर्यंत जरा जरी चांगले काम केले असते तर आज त्यांना सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि सगळे केंद्रीय मंत्री दिल्ली महापालिकेच्या प्रचारासाठी आणावे लागले नसते, अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणाले, की दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला 230 पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजपला 20 पेक्षा कमी जागा मिळतील असे ते म्हणाले. आम्हाला दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ता मिळाली तर आम्ही दिल्ली चमकावून दाखवू. येथील कचरा आणि पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवू, अशी ग्वाही त्यांनी येथील प्रचारसभेत बोलताना दिली.
भारतीय जनता पक्ष रात्रंदिवस मला शिव्या देण्याचे काम करतो पण त्यांनी दिल्लीत महापालिकेच्या माध्यमातून काम केले असते तर लोकांचे थोडे तरी भले झाले असते असे ते म्हणाले.
भारत जोडो यात्रेमुळे आपल्या स्वत:मध्ये चांगले बदल घडले – राहुल गांधी
भाजपकडून सध्या विविध व्हिडीआ जारी करून आम आदमी पक्षाला लक्ष्य केले जात आहे, त्या संबंधात केजरीवाल म्हणाले की, भाजप आता व्हिडीओ काढणारी कंपनी झाली आहे. ते रोज सकाळी एक व्हिडीओ घेऊन येतात. सकाळी 9 वाजता त्यांचा मॉर्निंग शो सुरू होतो आणि दुपारी 12 वाजता त्यांचा व्हिडीओ शो फ्लॉप होतो अशी खिल्लीही त्यांनी उडवली.




