दिल्ली सरकार, ऍपल, व्हॉटस् ऍप आणि गुगलला नोटीस

नवी दिल्ली : जवाहरालाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली सरकार, ऍपल, व्हॉटस् ऍप आणि गुगल यांना दिल्ली उच्च न्यायलयाने नोटीस बजावली. विद्यापीठाच्या आवारात झालेल्या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज, व्हॉटस् ऍप संभाषण आणि अन्य पुराव्यांचे जतन करावे, अशी मागणी कराणारी याचिका तीन प्राध्यापकांनी केली आहे. त्यांच्या याचिकेवरून ही नोटीस बजावण्यात आली.
संबंधित पक्षांनी या बाबत उच्च न्यायलयात मंगळवारी म्हणणे मांडावे, असे आदेश न्यायलयाने दिले. जेएनयु हिंसाचार घडवण्यात सहभागी असलेल्या दोन ग्रुपचा डाटा जतन करावा असे व्हॉटस् ऍपला कळवले आहे, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले. दिल्ली सरकारचे वकील (गुन्हे) राहुल मेहरा म्हणाले, विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
युनिटी अगेन्स्ट लेफ्ट आणि फ्रेंडस ऑफ आरएसएस या दोन ग्रुपवरचे मेसेज, छायचित्रे, व्हिडिओ आणि सदस्यांचे फोन नंबर जतन करायला सांगितले आहेत. हे दोन्ही ग्रुप जेएनयुमधील हिंसाचाराशी संबंधित आहेत, असे ते म्हणाले. अमित परमेश्वरन, अतूल सूद, शुक्ल विनायक सावंत या जेएनयुमधील प्राध्यापकांनी दिल्ली पोलिस आणि दिल्ली सरकारला याबाबात सुचना द्याव्यात अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.





