Delhi Fire Incidents : दिल्लीत एकाच दिवशी आगीच्या 201 घटना

नवी दिल्ली – दिल्ली अग्निशमन विभागाला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटनांचे काल 201 कॉल आले होते. (Delhi fire department gets 201 calls on Diwali) गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 32 टक्क्यांनी जास्त आहे. अधिकृत आकडेवारीनुसार विभागाला 2021 मध्ये 152, 2020 मध्ये 205, 2019 मध्ये 245, 2018 मध्ये 271, 2017 मध्ये 204, 2016 मध्ये 243 आणि 2015 मध्ये 290 आगीशी संबंधित कॉल आले होते.
सोमवारी झालेल्या एका घटनेत पूर्व दिल्लीतील गांधी नगर भागातील एका कपड्याच्या कारखान्यात संध्याकाळी आग लागली. या कारवाईत कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावरून चार जणांना वाचवण्यात यश आले, या प्रयत्नांत अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला.
उत्तर-पश्चिम दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात एका रेस्टॉरंटमध्येही आग लागली.सध्या दिल्ली परिसरात फटाक्यांना बंदी आहे पण ही बंदी धुडकाऊन नागरीकांनी काल तुफानी आतषबाजी केली. कायदेशीर अडथळे असतानाही शहराच्या अनेक भागात लोकांनी सायंकाळपासूनच फटाके फोडण्यास सुरुवात केली होती.
जसजशी रात्र वाढत गेली, तसतशी फटाक्यांची तीव्रता वाढली, परवानगीयोग्य डेसिबल मर्यादेचेही उल्लंघन झाले. मंगळवारी सकाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत खराब’ श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली होती परंतु अनुकूल हवामानामुळे फटाके आणि पेंढा जाळण्याचा परिणाम कमी झाल्यामुळे परिस्थिती मागील वर्षांपेक्षा तुलनेने चांगली होती.





