‘आज न्याय मिळाला… दिल्ली मुक्त झाली’, केजरीवालांच्या पराभवानंतर जुन्या सहकाऱ्याची खरमरीत टीका

Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. या निवडणुकीतील अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. 27 वर्षांनंतर भाजप दिल्लीत सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ‘आप’च्या अनेक प्रमुख नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या परवेश वर्मा यांनी पराभव केला आहे. याशिवाय, आप नेते मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला आहे. यावर आता केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी डॉ. कुमार विश्वास यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘माझ्यावर राम आणि कृष्णांची कृपा झाली की मी या सर्कशीतून (आम आदमी पक्ष) बाहेर येऊ शकलो’, असे म्हणत कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपला विजयासाठी शुभेच्छा देत ते म्हणाले की, ‘मी अपेक्षा करतो की भाजप दिल्लीच्या मतदारांच्या आशा आणि अपेक्षांवर खरी उतरेल आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करेल.’
केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या पराभवावर बोलताना कुमार विश्वास म्हणाले, “जेव्हा मनीष सिसोदिया यांच्या पराभवाची बातमी मिळाली, तेव्हा माझी अराजकीय पत्नी रडू लागली. कारण त्यांनी (सिसोदिया) तिला आधी सांगितलं होतं की ‘अजून ताकद बाकी आहे.’, त्यावर तिने उत्तर दिलं होतं की, ‘ताकद सदैव राहात नाही.’ आता मी त्यांना गीता पाठवणार आहे.’
केजरीवाल यांचे नाव न घेता कुमार विश्वास यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘ज्याने आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी अण्णा आंदोलनातून बाहेर पडलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या स्वप्नांची मोडतोड केली, त्या व्यक्तीबद्दल मला कोणतीही सहानुभूती नाही. दिल्ली आता त्यांच्यापासून मुक्त झाली आहे. त्याने ‘आप’ कार्यकर्त्यांचा वापर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केला. आज न्याय मिळाला आहे, अशी बोचरी टीका विश्वास यांनी केली.
‘मी ‘आप’च्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही कोणत्याही लोभपोटी, सर्व काही माहिती असतानाही अशा व्यक्तीच्या समर्थनासाठी काम केले, ज्याने आपल्या मित्रांच्या पाठीत सुरा खुपसला, गुरूला धोका दिला आणि आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिलांना घरी बोलावून मारहाण केली. आता त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवणं सोडा आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहा’, असे देखील कुमार विश्वास म्हणाले.




