Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही त्यांच्या मतदारसंघातून पराभव झाला. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांचे राजकीय भवितव्य काय असणार? याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्ली हातातून गेल्यानंतर केजरीवाल आता सक्रीय राजकारणापासून लांब राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय, केजरीवाल हे पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशाही चर्चा रंगल्या आहेत.
दिल्लीच्या अनपेक्षित पराभवानंतर केजरीवाल सक्रीय झाले आहेत. दिल्लीतील पराभवानंतर आता आपची सत्ता असलेले पंजाब हे एकमेव राज्य आहे. त्यांनी पंजाबच्या सर्व आमदारांची बैठक बोलवली असून, या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील मतदार सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याने ‘आप’चा पराभव झाल्याचे सांगितले जाते. याशिवाय, ‘आप’चे पंजाबमधील 30 आमदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावाही एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवून त्यांच्या जागी इतर नेत्याची निवड केली जाऊ शकते, अशा चर्चा सुरू आहेत. प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांकडून याबाबत नेरेटिव्ह सेट केले जात आहे. केजरीवाल यांचे लक्ष पंजाबचे मुख्यमंत्रीपद आहे, अशी चर्चाही रंगली आहे. या चर्चेमागे अनेक कारणं सांगितली जात आहेत.
दिल्लीत आपचा पराभव झाल्याने केजरीवाल यांच्याकडे सध्या तरी सरकारमधील राजकीय पद नाही. त्यांच्यासमोर राज्यसभेवर जाण्याचा देखील मार्ग आहे. मात्र, पंजाबमध्ये राज्यसभेची निवडणूक वर्ष 2028 मध्ये, तर दिल्लीत 2030 मध्ये होणार आहे. त्यामुळे केजरीवाल सक्रिय राजकारणापासून इतका लांब राहू शकतील का? असा प्रश्न विचारला जात आहे.
याशिवाय, लुधियाना (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये सामील होण्यासाठी केजरीवाल या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. त्यानंतर ते पंजाबच्या राजकारणात सक्रीय होऊन पंजाबमधून आपचे नेतृत्व करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतचे केवळ अंदाज व्यक्त केले जात आहे. आप अथवा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यावर कोणतीही अधिकृत माहिती अथवा प्रतिक्रिया दिलेली नाही.