महाठग सुकेशचे केजरीवालांना पत्र, ‘त्या’ भविष्यवाणीची करून दिली आठवण; राजकारणातून संन्यास घेण्याचाही दिला सल्ला

Sukesh’s Letter to Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (आप) पराभव झाला आहे. दिल्लीतील एकूण 70 जागांपैकी केवळ 22 जागा पक्षाला मिळाल्या आहेत. तर भाजपचा 48 जागांवर विजय झाला. यातच आता कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.
महाठग सुकेशने मंडोली जेलमधून केजरीवाल यांना पत्र लिहित त्याच्या भविष्यवाणीची आठवण करून दिली आहे. सोबतच, राजकारणातून संन्यास घेण्याचा देखील सल्ला दिला.
सुकेशने केजरीवाल यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, ‘सर्वातआधी तुम्हाला, मनीषजी आणि सत्येंद्रजी यांना निवडणुकीतील पराभवासाठी अभिनंदन देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कट्टर भ्रष्ट पार्टी आप निवडणूक हरली आहे. केजरीवालजी, जर तुमच्याकडे माझी मागील पत्रं सुरक्षित असतील तर कृपया ती पाहा. 3, 6, 8 महिन्यांपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की तुम्ही तुमची जागा गमवाल आणि आप सत्तेबाहेर जाईल.’
सुकेश चंद्रशेखरने पुढे लिहिले की, ‘आज अगदी तसचं झालं आहे. तुम्हाला बाहेर काढण्यात आले आहे, तुमचा सर्व अहंकार तुमच्यासोबतच शौचालयात वाहून गेला. तुमचे सर्व जुमले उघडकीस आले आहेत. दिल्लीच्या जनतेने तुम्हाला आणि तुमच्या जगातील सर्वात भ्रष्ट पार्टीला खऱ्या अर्थाने लाथ मारली आहे.’
तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना थोडी लाज वाटायला हवी. राजकीय संन्यास घ्या, कारण पुढच्या वेळेस पंजाबमध्येही तुमचा पराभव होणार आहे., असेही त्याने पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुकेशने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देखील पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्याने वर्ष 2024 मधील त्यांच्या परदेशी उत्पन्नावर 7,640 कोटी रुपयांचा कर भरण्याची तयारी दर्शवली होती.




