Delhi Election: दिल्ली मुख्यमंत्री अतिशींच्या विरोधात काॅंग्रेसच्या अलका लांबा मैदानात

नवी दिल्ली – कॉंग्रेसने शुक्रवारी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत कालकाजी मतदारसंघातून थेट दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांच्याशी होईल.
दिल्लीतील निवडणुकीची घोषणा पुढील काही दिवसांत अपेक्षित आहे. त्यासाठी सत्तारूढ आपने याआधीच सर्व ७० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
कॉंग्रेसनेही आतापर्यंत २ याद्यांच्या माध्यमातून ४७ उमेदवार घोषित केले. त्या पक्षाने केवळ एका उमेदवाराच्या नावाचा (अलका) समावेश असणारी तिसरी यादी जाहीर केली. अलका यांना उमेदवारी देऊन कॉंग्रेसने आतिशी यांच्या समोर तगडे आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे. अलका दिल्लीच्या माजी आमदार आहेत.
त्यांनी २०१५ मधील निवडणुकीत आपच्या तिकिटावर चांदणी चौक मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्याआधी कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला. नंतर सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी कॉंग्रेसवापसी केली. त्या पक्षाने अलका यांच्यावर सातत्याने विश्वास दर्शवल्याचे दिसते.





