भाजपकडून प्रदूषणाचे घाणेरडे राजकारण, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे थेट आरोप…

Delhi । दिल्लीमध्ये वाढत असलेल्या वायू आणि जल प्रदूषणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. आतिशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, दिल्लीमध्ये केवळ वायू प्रदूषण नाही तर यमुना नदीचं पाणीही प्रचंड प्रदूषित होतंय, आणि याला भाजपचे घाणेरडे राजकारण जबाबदार आहे.
Delhi । पराली आणि वायू प्रदूषण
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या मते, दिल्लीतील वायू प्रदूषणाचं मुख्य कारण पराली जाळणं आहे. मात्र, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर पराली जाळण्याच्या घटनांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. याउलट, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातल्या भाजप सरकारांनी पराली जाळणं थांबवण्यासाठी अजून काहीही ठोस पावलं उचललेली नाहीत, ज्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय.
Delhi । इतर राज्यांमधून येणाऱ्या डिझेल बस…
आनंद विहार आयएसबीटीचं उदाहरण देत आतिशी म्हणाल्या, “दिल्ली सरकार सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस चालवतेय, पण इतर राज्यांतून येणाऱ्या डिझेल बसमुळे दिल्लीचं प्रदूषण वाढतंय.” त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि हरियाणातल्या वीट भट्ट्या आणि थर्मल पॉवर प्लांट्सही मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
Delhi । यमुना नदीच्या प्रदूषणामागे हरियाणा आणि उत्तर प्रदेश
यमुना नदी फेसाळत असल्याबाबत बोलताना आतिशी यांनी आरोप केला की, हरियाणामधून रोज 165 एमजीडी आणि उत्तर प्रदेशातून 55 एमजीडी औद्योगिक कचरा यमुनेत सोडला जातोय, ज्यामुळे नदीचं प्रदूषण वाढतंय. यावर उपाय म्हणून दिल्ली सरकार सातत्याने काम करत आहे, पण या राज्यांमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपने जर कठोर पावलं उचलली नाहीत, तर आम्ही हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत नेऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Delhi । भाजपला यमुना साफ नकोय
माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनीही पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. ते म्हणाले, “आम आदमी पार्टीच्या सरकारनं यमुना स्वच्छ करण्यासाठी मोठं काम केलंय, पण भाजपला यमुनेची स्वच्छता नकोय, कारण त्यांचे राजकीय स्वार्थ यात अडकले आहेत.”
जैन यांनी सांगितलं की, हरियाणातून बादशाहपूर ड्रेनमधून जवळपास 200 एमजीडी औद्योगिक कचरा यमुनेत येतो. तेव्हा आम्ही आवाज उठवतो, तर आमच्यावरच कारवाई केली जाते.





