WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचा गुजरात जायंट्सवर 6 विकेट्स राखून दणदणीत विजय

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील दहावा सामना आज गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 6 विकेट्स राखून गुजरात जायंट्स संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेकीचा कौल जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सुरुवात त्यांची अडखळत झाली. त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. त्यामुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातकडून भारती फुलमाळीने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे गुजरात जायंट्सने 20 षटकात 9 गडी गमवून 127 धावांपर्यंत मजल मारता आली. बाकी खेळाडूंना काही विशेष कामगिरी करता आली नाही.
तर दुसरीकडे फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने हे माफक आव्हान ४ खेळाडूंच्या मोबदल्यात १५ ओव्हरमध्येच पूर्ण केले. दिल्लीकडून शेफाली वर्माने ४४ तर जेस जोनासेन हिने नाबाद ६१ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, ॲशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, भारती फुलमाली, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मेघना सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, शिखा पांडे, तितस साधू, मिन्नू मणी.





