Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ला जवळील मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या एका भीषण स्फोटामुळे देशातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये मोठ्या तीव्रतेचा स्फोट (High Intensity Blast) झाला. या स्फोटानंतर आसपासच्या अनेक वाहनांनी पेट घेतला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. लाजपत राय मार्केटमधील काही भागांना आग लागली, तर जवळच्या जैन मंदिराच्या आणि आसपासच्या दुकानांच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. दिल्ली पोलीस आणि विशेष सेलची पथकेही तपास करत आहेत. या दुर्घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला असून २४ लोक जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दिल्लीत स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. या आधीही मागील २९ वर्षांमध्ये १६ पेक्षा जास्त वेळा स्फोट झाले आहेत. दिल्लीत कधी आणि कुठे-कुठे हे जाणून घेऊया. २५ मे १९९६: लाजपत नगर सेंट्रल मार्केटमध्ये बॉम्बस्फोट – १६ जणांचा मृत्यू. १ ऑक्टोबर १९९७: सदर बाजाराजवळ दोन बॉम्बस्फोट – अंदाजे ३० जण जखमी. १० ऑक्टोबर १९९७: शांतीवन, कौडिया पुल आणि किंग्जवे कॅम्पमध्ये तीन स्फोट – १ मृत, १६ जखमी. १८ ऑक्टोबर १९९७: राणी बाग मार्केटमध्ये दोन स्फोट – १ मृत, २३ जखमी. २६ ऑक्टोबर १९९७: करोल बाग मार्केटमध्ये दोन स्फोट – १ मृत, ३४ जखमी. ३० नोव्हेंबर १९९७: लाल किल्ला परिसरात दोन स्फोट – ३ मृत, ७० जखमी. ३० डिसेंबर १९९७: पंजाबी बागजवळ बसमध्ये स्फोट – ४ मृत, ३० जखमी. १८ जून २०००: लाल किल्ल्याजवळ दोन शक्तिशाली स्फोट – २ मृत, १२ जखमी. ६ मार्च २०००: सदर बाजारात स्फोट – ७ जखमी. ७ फेब्रुवारी २०००: पहाडगंजमध्ये स्फोट – ८ जखमी. १४ एप्रिल २००६: जामा मशीद परिसरात दोन स्फोट – १४ जखमी. २२ मे २००५: लिबर्टी आणि सत्यम चित्रपटगृहांमध्ये स्फोट – १ मृत, ६० जखमी. २९ ऑक्टोबर २००५: सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे तीन स्फोट – ५९-६२ मृत, १००पेक्षा जास्त जखमी. १३ सप्टेंबर २००८: करोल बाग, कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास-१ येथे पाच स्फोट – २०-३० मृत, ९०पेक्षा जास्त जखमी. २७ सप्टेंबर २००८: मेहरौली फ्लॉवर मार्केट (सराई) मध्ये स्फोट – ३ मृत, २३ जखमी. २५ मे २०११: दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट – कोणतीही जीवितहानी नाही.