तक्रार आल्यास महिलेची ‘ती’ छायाचित्रे 24 तासांत हटवा; सोशल साईट्सला सूचना

नवी दिल्ली – कोणत्याही महिलेने तिचे नग्न अथवा मॉर्फ केलेले फोटो समाज माध्यमांत प्रसारीत केल्याबाबत महिलेने आक्षेप घेतल्यानंतर 24 तासांत ते छायाचित्र समाज माध्यमाच्या कंपनीने 24 तासांत काढून टाकले पाहिजे, अशी तरतूद महिलांबाबतच्या आचारसंहितेत करण्यात आली आहे, असे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.
इंटरनेट साम्राज्यवाद या देशाला मान्य नाही. त्यामुळे सरकार त्यांची एकाधिकारशाही होऊ देणार नाही. देशांत होणाऱ्या निवडणुकांना याचा कोणताही धोका नाही. आपले मंत्रालय निवडणूक आयोगासोबत त्यासंदर्भात काम करत आहे. नव्या आचारसंहितेनुसार देश विघातक अथवा जनतेला चिथावणी देणारा मजकूर 36 तासांत हटवला पाहिजे. खोट्या बातम्या प्रसारीत होऊ नयेत अथवा द्वेषवर्धन करणारा मजकूर प्रसारित केला जाऊ नये म्हणून समजामाध्यमांतील बोगस अकाउंटधारक काढून टाकण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र हे सर्व स्वयंसेवी पध्दतीने व्हावे त्यात सरकारचा कोणताही सहभाग नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.


