Dehugaon: प्रभातच्या वृत्ताची दखल; येलवाडी–देहू हद्दीवरील कचऱ्याचे साम्राज्य हटविले
Dehugaon : इंद्रायणी नदीकाठचा हा परिसर तीर्थक्षेत्र देहू आणि येलवाडी येथे येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा

देहूगाव: – तीर्थक्षेत्र येलवाडी आणि तीर्थक्षेत्र देहू यांच्या हद्दीवर, इंद्रायणी नदीवरील पुलाजवळच साचलेल्या कचऱ्यामुळे परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याबाबत पवित्र इंद्रायणी नदीवरच कचऱ्याचे साम्राज्य! या शीर्षकाखाली दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध करून स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत प्रशासनाने परिसरातील कचरा हटविण्याची कार्यवाही केली आहे.
इंद्रायणी नदीकाठचा हा परिसर तीर्थक्षेत्र देहू आणि येलवाडी येथे येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसराचे विद्रुपीकरण झाले होते. त्यामुळे नागरिकांमधूनही प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त होत होती.
प्रभातने या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा हटवून परिसर स्वच्छ केला आहे. तसेच भविष्यात या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला जाऊ नये, यासाठी नागरिकांना तंबी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा नदीकाठावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
इंद्रायणी नदी आणि आसपास च्या परिसराची स्वच्छता राखणे ही प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना सुज्ञ नागरिकांनी रोखावे. तसेच नागरिकांनी नदीकाठ, पूल व सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





