देहूरोड पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड; दोघांना अटक

देहूरोड – स्वत:ला ‘भाई’ म्हणवून परिसरात दहशत पसरवणाऱ्या दोन गुन्हेगारांना देहूरोड पोलिसांनी अटक करून त्यांची धिंड काढली. मारामारी, दरोडा, चोरी आणि घातक शस्त्र बाळगण्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. चंदू गोरख सकट (वय 38) आणि करण अरुण सकट (वय 23, दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांच्या दोन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चंद्रकांत काळखैर (वय 50, रा. गांधीनगर, देहूरोड) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (दि. 13) सकाळी 9 वाजता काळखैर घरी जात असताना शेजारी राहणारे सकट बंधू आणि त्यांचे साथीदार दारू पित होते. त्यांनी काळखैर यांना शिवीगाळ केली. “शिवीगाळ करू नका,” असे काळखैर यांनी सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्या घरात घुसून लाकडी बॅट आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बॅट, लोखंडी रॉड आणि चाकू जप्त करण्यात आले. त्यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत.
वडगाव न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार साथीदारांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंकी करत आहेत.





