Dehu Road Flyover – कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला देहूरोड उड्डाणपूल अक्षरशः नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्यात या पुलावरून ‘धबधबा’च कोसळत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे ते थेट खाली रस्त्यावर कोसळते. याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. या घाण पाण्याचा मारा पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांवर होत असून अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन या पुलाखालून प्रवास करत आहेत.या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याचा संतापजनक आरोप स्थानिकांकडून होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेसह इतर ठिकाणी उड्डाणपुलांचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई आणि दर्जेदार कामे होत असताना देहूरोडचा पूल मात्र निकृष्ट दर्जाचा ठरत असल्याने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले का, असा सवाल उपस्थित होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोजेस दास, डॉमनिक दास, फ्रान्सिस थॉमस, आरकीमेरी थॉमस आदिलच्या स्वाक्षरीच्या निवेदनाद्वारे राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासनाला देण्यात आले आहे. निवेदनात इशारा दिला आहे की, आठ दिवसांच्या आत पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ उपाययोजना, पीव्हीसी पाइपलाइन, तसेच पुलाचे सुशोभीकरण व विद्युत रोषणाई करण्यात यावी, अन्यथा मनसे स्टाइलने ”ने जोरदार रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.