देहूगाव – देहू नगरपंचायतीकडून दीड महिन्यापूर्वी अतिक्रमण विभागामुळे कारवाईला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र फ्लेक्स, बॅनर, जाहिरातींचे फलक तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणांवर अजूनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्याने, हा विभाग कागदावरचा असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्याधिकारी चेतन कोंडे यांनी दैनिक प्रभातमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेत अतिक्रमण विभागाची स्थापना केली. नगररचना विभाग प्रमुख सुरेंद्र आंधळे, स्थापत्य अभियंता संघपाल गायकवाड यांच्यासह १३ कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. ३० सप्टेंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांनी अधिकृत आदेशही जारी केले. शासकीय जागा, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण तसेच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र दीड महिना उलटूनही शहरात सर्वत्र फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर तसेच रस्त्यांवरील अतिक्रमण कायम असल्याचे चित्र दिसत आहे. व्यवसायिकांनी उभारलेले फलक आणि विविध राजकीय फ्लेक्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून, नागरिकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. वाहतूक कोंडी व शहराचे विद्रुपीकरण मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर, विशेषतः मंगळवारी आणि शुक्रवारी भरत असलेल्या बाजारपेठ परिसरात, तसेच परंडवाल चौकात अतिक्रमणाची समस्या अधिक तीव्र आहे. दुकानांसमोर वाढलेले अतिक्रमण, हातगाड्या आणि जाहिरात फलक यामुळे वाहतूक कोंडी विकोपाला पोहोचत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, नगरपंचायतीने पथक तयार केले असले तरी कारवाई शून्य असल्याने या विभागाचे अस्तित्व केवळ कागदापुरते मर्यादित राहिले आहे. शहरातील वाढत्या अव्यवस्थेविरोधात अनेक नागरिकांनी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.