देहू : श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे

Jalindar Vishwanath More as President | श्री क्षेत्र देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थांच्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाची निवडणूक ३१ मार्च रोजी शांततेच्या वातावरणात पित्ती धर्मशाळेत पार पडली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान प्रक्रिया संपन्न झाली. सायंकाळी सहानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. चुरशीच्या झालेल्या अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी जालिंदर विश्वनाथ मोरे हे विजयी झाले. तर विश्वस्तपदी विक्रम मोरे, वैभव मोरे, गणेश मोरे, उमेश मोरे, दिलीप मोरे, लक्ष्मण मोरे निवडून आले आहेत.
या निवडणुकीत अध्यक्षपदी विजयी झालेले जालिंदर मोरे यांना १६३ मते मिळाली. संस्थांच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते. संस्थांच्या तीन शाखा असल्याने गोविंदबुवा शाखेकडून विश्वजित मोरे, कैलास मोरे, जालिंदर मोरे या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यापैकी जालिंदर मोरे यांची संस्थांच्या अक्ष्यक्षपदासाठी वर्णी लागली आहे. त्यांना मिळालेल्या एकूण मतांपैकी ते ६३ मतांनी विजयी झाले आहेत.
देहूगाव संस्थानच्या तीन शाखा आहेत. त्या पुढीलप्रमाणे आबाजीबुवा, गणेशबुवा आणि गोविंदबुवा. या शाखेतून प्रत्येकी दोन असे सहा विश्वस्त निवडले जातात. तर, प्रत्येक शाखेतून दोन वर्षासाठी एक अध्यक्ष निवडला जातो. निवडून आलेले सहा विश्वस्त आणि प्रत्येक दोन वर्षांनी निवडला जाणारा अध्यक्ष हे पुढील सहा वर्षे देवस्थानचा कारभार सांभाळणार आहेत. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अंकुश मोरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सुजित मोरे आणि शामकांत मोरे यांनी कामकाज पाहिले.





